...आणि तोरणा सर केला!
दरवर्षी मी आणि निहार अशी एक खास ट्रिप काढतो. फक्त आम्ही दोघे. बाप आणि मुलगा. या प्रवासात तिसऱ्या कुणालाही जागा नसते. ही कल्पना खरं तर मागच्या वर्षी स्वातीनेच दिली. तिला एकटीला सोडून जाणं आम्हा दोघांनाही पटत नव्हतं, पण तिचा आग्रह आम्ही मान्य केला… आणि त्या एका निर्णयाने मी आणि निहार अधीक जवळ आलो. पत्रकारितेत आलो आणि कामाच्या व्यापात इतका गुरफटलो की, कुटुंबासाठी वेळ देणं मागे पडलं. निहारचं बालपण कधी निसटून गेलं, ते कळलंच नाही. आता तो मोठा झाला… आणि खरंच, बापाच्या चपला मुलाच्या पायात बसायला लागल्या की नातं आपोआप मित्राचं होतं, हे अनुभवायला मिळायला लागलं. मागच्या वर्षी आम्ही पुणे, रायगड, सातारा, प्रतापगड असा प्रवास केला. यंदा निहार दहावीला गेला. पुढचं वर्ष अभ्यासात जाणार, म्हणून हा छोटासा ब्रेक हवाच होता. यावेळी आम्ही ठरवलं, राजगड, तोरणा आणि वाई! फक्त तीन दिवस, त्यात एवढं मोठं लक्ष्य… थोडं कठीण वाटत होतं. पण निहारचा उत्साह माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. आमच्यात एक गोष्ट मात्र कॉमन आहे; भटकंती आणि गड-किल्ल्यांची ओढ! सुरुवात केली वाईपासून. मंदिरांचं शहर… शांत, सुंदर आणि आपुलकीचं...