मना सज्जना- खोट्या आकर्षणाला मन का भुलतं?
कधी कधी एक प्रश्न मनात उभा राहतो. इतकी वर्षं जगलेला माणूस. अनुभव घेतलेले स्त्री-पुरुष. तरीही कुणाच्या खोट्या बोलण्याला. खोट्या कौतुकाला. शो-ऑफला. आपण इतकं सहज का भुलतो. आपल्याला आतून माहीती असतं. हे खरं नाही. हे नाटक आहे. हे बोलणं पोकळ आहे. तरीही मन तिकडे ओढलं जातं. आणि जे लोक सरळ बोलतात. जे स्पष्ट भूमिका घेतात. जे समोरासमोर खरं सांगतात. ते मात्र त्रासदायक वाटतात. “फार तोंडावर बोलतात.” “फार कडक आहेत.” “फार स्पष्ट आहेत.” असं आपण म्हणतो. मग प्रश्न पडतो. मन इतकं कमकुवत असतं का. की सत्य सहन होत नाही. आणि खोटं गोड वाटतं. खरं तर हे कमकुवतपणाचं नाही. हे असुरक्षिततेचं लक्षण असतं. जिथे मनाला सतत मान्यतेची भूक असते. कौतुक हवं असतं. कोणी तरी “तू खास आहेस” असं म्हणावं अशी अपेक्षा असते. आणि ही भूक. खोटं बोलणारे लोक अचूक ओळखतात. ते मुद्दाम गोड बोलतात. मुद्दाम कौतुक करतात. मुद्दाम वेगळं भासवतात. हे खरं आहे हे त्यांनाही माहीत नसतं. पण ते परिणामकारक आहे हे त्यांना माहीत असतं. अशा लोकांचा प्रभाव सगळ्यांवर नसतो. तो एका ठराविक समूहावर असतो. ज्यांना स्वतःबद्दल शंका असते. ज्य...