जग धुमसते आहे, धुमसतच राहणार
युद्ध ही निरंतर चालणारी प्रक्रिया झाली आहे. युद्धाशिवाय जग चालूच शकत नाही अशी सध्या परिस्थिती आहे. शस्त्रांचा व्यापार, परस्पर हितसंबंध ही यामागची काही प्रमुख कारण आहेत. जग मागील कैक वर्षांपासून अथवा दशकांपासून अस्थिर आहे. तृतीय विश्व युद्धाला केव्हाच सुरुवात झाली आहे. आगामी काळात हे युद्ध इतके भीषण होईल आणि यामुळे इतका मोठा नरसंहार होईल याची आता आपण कल्पनाही करू शकणार नाही. म्हणूनच यापूर्वीही जग धुमसत होते आत्ताही जग धुमसत आहे आणि यानंतरही जग धुमसत राहणार. जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य प्राणी अस्तित्वात आहे तोपर्यंत जगात युद्ध होतच राहतील. पहलगाव हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांत मोठा तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी तळ उध्वस्त केली. यानंतर आशिया खंडामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव कमी केला. दोनही देशांनी शस्त्रसंधी मान्य करत सैन्य कारवाया रोखत असल्याची जाहीर केले. ...