जग धुमसते आहे, धुमसतच राहणार

युद्ध ही निरंतर चालणारी प्रक्रिया झाली आहे.  युद्धाशिवाय जग चालूच शकत नाही अशी सध्या परिस्थिती आहे.  शस्त्रांचा व्यापार,  परस्पर हितसंबंध  ही यामागची काही प्रमुख कारण आहेत.  जग मागील कैक वर्षांपासून अथवा दशकांपासून अस्थिर आहे.  तृतीय विश्व युद्धाला केव्हाच सुरुवात झाली आहे.  आगामी काळात हे युद्ध इतके भीषण होईल आणि यामुळे इतका मोठा नरसंहार होईल याची आता आपण कल्पनाही करू शकणार नाही.  म्हणूनच यापूर्वीही जग धुमसत होते आत्ताही जग धुमसत आहे आणि यानंतरही जग धुमसत राहणार. जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य प्राणी अस्तित्वात आहे तोपर्यंत जगात युद्ध होतच राहतील. 



पहलगाव हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांत मोठा तणाव निर्माण झाला होता.  भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी तळ उध्वस्त केली. यानंतर आशिया खंडामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव कमी केला. दोनही देशांनी शस्त्रसंधी मान्य करत सैन्य कारवाया रोखत असल्याची जाहीर केले. वारंवार होणारे  दहशतवादी हल्ले,  दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळणारे प्रोत्साहन, त्यांना पाकिस्तानकडून मिळणारी आर्थिक मदत या सर्व  कारणांमुळे पहलगाव हल्ल्यानंतर साऱ्या भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे.  जगाच्या नकाशावरून पाकिस्तान मिटवून टाका इथपर्यंतच्या तीव्र भावना भारतीयांच्या आहेत.  


जगभरातील भारतीय या एकाच भावनेने एकवटले आहेत. काही राजकीय,  आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक किंवा संरक्षण विषयक तज्ज्ञ  भारत पाकिस्तान युद्ध म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी असल्याचे बोलतात.  दिवसभर टीव्हीवर सुरू असणाऱ्या चर्चा, सोबतच वर्तमानपत्रांचे रकाने याच चर्चांनी व्यापले आहेत; पण मुळात इतिहासाची पानं उलटली आणि जगभरातील घडामोडींचा आपण जर विचार केला तर असे अधोरेखित होते की, मागच्या शंभर वर्षांपासून जग धुमसत आहे. जगामध्ये अशांतता आहे.  जग अस्थिर आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने दोन परस्पर शेजारी अथवा  पराकोटीचा वैचारिक मतभेद असल्याने कोणत्या ना कोणत्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण तरी झाली आहे. अथवा दोन देशांमध्ये युद्ध तरी पेटलेले आहे. 


पहिले व दुसरे महायुद्ध

साधारणतः 1914 ते 1918 दरम्यान पहिले महायुद्ध झाले त्याला बरोबर 111 वर्ष पूर्ण झाली आहेत.  या महायुद्धाची कारणे अनेक होती जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. जगावर राज्य करण्याची महत्त्वकांक्षा, परस्पर देशांमध्ये निर्माण झालेला अविश्वास, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च नेता होण्यासाठी सुरु असलेली चढाओढ. अशी काही प्रमुख करणे यामागे होती.  


अजूनही इतिहास अभ्यासक पहिल्या व दुसऱ्या विश्वयुद्धाच्या कारणांचा अभ्यास करत आहेत.  मागील शंभर वर्षात अनेकांनी पहिल्या विश्वयुद्धाची अनेक कारणे सांगितली; पण कोणत्याही ठोस एका कारणावर तज्ज्ञांचे एकमत झाले नाही.  जो ज्या देशाचा समर्थक, जो ज्या देशाच्या विचारसरणीशी सहमत असणारा तज्ज्ञ असेल त्याने त्या त्या गटाचा आणि त्या त्या देशांचा विचार करत पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची कारणं निश्चित केली आणि ती जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला.  


28 जून 1914 रोजी हंगेरीचे युवराज आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनँड यांचा सर्बियन युवकाने खून केला व पहिले विश्व युद्ध सुरू झाले असे बोलले जाते.  परंतु युरोपात सत्ता वसाहती आणि राजकीय वर्चस्वाची स्पर्धा, काही देशांमध्ये निर्माण झालेली अघोरी राष्ट्रभक्तीची तीव्र भावना ही पहिल्या विश्व युद्धाची कारणं मानली जातात.  या युद्धात कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला.  


1939 ते 1945 दरम्यान दुसरे विश्वयुद्ध झाले. अवघ्या 21 वर्षात जगाला पुन्हा एकदा विश्वयुद्धाची खुमखुमी आली.  अर्थातच  पहिल्या विश्वयुद्धानंतर अनेक देश धुमसतच होते त्याचीच परिणती म्हणून दुसरे विश्व युद्ध पेटले. 


जूवंशीयांवर नाझींकडून सुरू झालेला अत्याचार, हिटलर याची जगावर राज्य करण्याची अति महत्त्वाकांक्षा,  इटली आणि जपान यांना करावयाचा असलेला सत्ताविस्तार  आणि १ सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर केलेला हल्ला  ही द्वितीय विश्वयुद्धाची प्रमुख कारण मानली जातात. 


पहिल्या विश्व युद्धाच्या कारणांची मीमांसा केली आणि द्वितीय विश्वयुद्धाच्या कारणांची तुलना केली तर आपले असे लक्षात येईल की, दोनही विश्वयुद्धांच्या कारणांमध्ये साधर्म्य आहे.  हे दोन्ही विश्वयुद्धे विकासासाठी,  मनुष्य जातीच्या प्रगल्भतेसाठी,  पर्यावरण संरक्षणासाठी झालेली नाहीत. या युद्धांच्या कारणांमध्ये केवळ आणि केवळ राजसत्तेचा विस्तार आणि जगावर राज्य करण्याची अति महत्वकांक्षा या दोनच प्रमुख कारणांचा समावेश होतो.  


अगदी महाभारत आणि रामायणापासूनचा इतिहास आपण धुंडाळायचा ठरवला तर युद्धांची कारणे देखील सारखीच आहेत. त्यामुळे तिसरे विश्वयुद्ध आता सुरू झाले असे म्हणणे, किंवा जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणणे चुकीचे होईल. 


कारण जग कधीही शांत आणि स्थिर नव्हतेच.  तिसऱ्या महायुद्धाला केव्हाच सुरुवात झाली आहे.  मागच्या 35 वर्षांचा जर आपण विचार केला तर आपले असे लक्षात येईल की, सातत्याने  जगभरातील कुठल्या ना कुठल्या देशांमध्ये युद्धे सुरूच आहेत. मानवी वृत्ती आणि प्रवृत्ती पाहिली तरीही युद्ध यापुढेही सुरूच राहणार आहेत. 

1990 नंतर शंभरावर युद्धे 

लेखाच्या सुरुवातीला आपण पहिले आणि दुसरे महायुद्ध याचा विचार केला या दोन्ही महायुद्धांना साधारणतः 111 वर्ष पूर्ण झाली आहेत.  पण 1990 नंतरचा अर्थात विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरचा आपण जर विचार केला तर 1990 नंतर आत्तापर्यंत छोटी मोठी अशी शंभरावर युद्ध जगामधल्या विविध देशांमध्ये झाली आहेत या युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झालीच आहे सोबत वित्तहानीही झाली आहे.  आता हीच काही मोठी युद्ध पहा…. 

जगभरातली महत्त्वाची युद्धं (1990 नंतर)

1️⃣ खाडी युद्ध (Gulf War) — 1990-1991

  • इराकने कुवेतवर हल्ला केला.

  • अमेरिका व ३५ देशांच्या सैन्याने इराकविरुद्ध कारवाई केली.

2️⃣ कोसोव्हो युद्ध — 1998-1999

  • सर्बिया विरुद्ध कोसोव्हो लिबरेशन आर्मीने युद्ध सुरु केले.  अनेक लोकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला.

  • नाटोने हस्तक्षेप करून युद्ध थांबवलं.

3️⃣ अफगाणिस्तान युद्ध — 2001-2021

  • 9/11 नंतर अमेरिका व सहकारी देशांनी तालिबानविरोधात  युद्ध सुरू केले.

  • तब्बल २० वर्षे युद्ध सुरू राहिलं. अखेर 2021 मध्ये अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान मधून आपला तळ हलवला आणि पुन्हा तालिबानी शासकांनी अफगाणिस्तान वर कब्जा केला.

4️⃣ इराक युद्ध — 2003-2011

  • अमेरिका आणि सहकारी देशांच्या सैन्याने सद्दाम हुसैनच्या विरोधात युद्ध पुकारलं. सद्दाम यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरविनाशकारी शस्त्रास्त्र आहेत व सद्दाम हे ती शस्त्रे तालिबानला देण्याच्या तयारीचे कारण पुढे करत अमेरिकेने इराक वर हल्ला करत सद्दाम हुसेन यांना जेरबंद केले आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली. . यामुळे इराक सारखा मोठा देश नेस्तनाबूत झाला.

5️⃣ रशिया-युक्रेन संघर्ष — 2014 (क्राइमिया) आणि 2022 पासून सध्या चालू

  • द्वितीय विश्व युद्ध नंतरच हे सर्वात मोठे युद्ध मानलं जातं. युक्रेनला नाटो मध्ये सहभागी व्हायचं होतं. (NATO - अमेरिकेसह पश्चिमी देशांची लष्करी संघटना) युक्रेन नाटो मध्ये गेला तर आपल्या अस्तित्वाला धोका आहे अशी भीती रशियाला वाटत होती. 2014 मध्ये रशियाने युक्रेनच्या क्राइमिया भागावर कब्जा केला. यानंतर खऱ्या अर्थाने हे युद्ध भडकलं.  आज तागायत हे युद्ध सुरूच आहे.  यात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकूणच काय तर सत्ताकांक्षा, सामरिक वर्चस्व, ऐतिहासिक तणाव आणि राजकीय स्पर्धा याच कारण मुळे हे युद्ध सुरू आहे. 

आता आपला, अर्थात भारताचा विचार करूया. भारताशी संबंधित युद्ध / लष्करी संघर्ष (1990 नंतर)

1️⃣ कारगिल युद्ध — 1999 

  • पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर भारताने ऑपरेशन विजय राबवत सगळ्या शिखरांवर ताबा घेतला. या युद्धात भारतीय सैन्यांनी अतुल्य अशी कामगिरी केली. पराक्रम दाखवला. पाकिस्तानी दहशतवादी आणि सैन्याने काबीज केलेल्या सर्व शिखर आणि चौक्या पुन्हा हस्तगत केल्या.

2️⃣ ऑपरेशन पराक्रम — 2001-2002

  • संसद हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव. युद्ध नव्हे, पण सैन्य तैनाती झाली होती.

3️⃣ डोकलाम संघर्ष — 2017

  • भारत-चीन सीमेवर भूतानच्या हद्दीत चिनी घुसखोरी विरोधात भारतीय लष्कराने पावलं उचलली.

  • ७३ दिवस तणाव.

4️⃣ गलवान संघर्ष — 2020

  • भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात भीषण संघर्ष.

  • २० भारतीय जवान वीरमरण. चिनींचेही मोठं नुकसान.

साधारणतः शंभर वर्षांपूर्वीपासूनची आपण ही युद्ध पाहिली या युद्धांमध्ये कारणं पुन्हा पुन्हा तीच ती येत आहेत.  या पुढील काळातही कदाचित युद्धाची कारणं हीच असतील; पण त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे कमी पडणारा भूभाग,  पाण्याची कमतरता,  समान आणि न्याय पाणी वाटप नसल्यामुळे होणारे वाद,  पर्यावरणाला निर्माण झालेला धोका,  ग्लोबल वॉर्मिंग,  अशी अनेक कारणे दाखवली जातील.  

आत्तापर्यंतच्या सर्व युद्धांचा अभ्यास केला तर एक बाब मात्र प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जग सतत धुमसत आहे.  युद्ध ही निरंतर चालणारी प्रक्रिया झाली आहे. युद्धाशिवाय जग चालूच शकत नाही.  जग मागील कैक वर्षांपासून अथवा दशकांपासून अस्थिर आहे. तृतीय विश्व युद्धाला केव्हाच सुरुवात झाली आहे. आगामी काळात हे युद्ध इतके भीषण होईल आणि यामुळे इतका मोठा नरसंहार होईल याची आता आपण कल्पनाही करू शकणार नाही.  म्हणूनच यापूर्वीही जग धुमसत होते आत्ताही जग धुमसत आहे आणि यानंतरही जग धुमसत राहणार जोपर्यंत. आपण सर्व शक्यतांची तयारी ठेवायची.  पृथ्वीवर मनुष्य प्राणी अस्तित्वात आहे तोपर्यंत जगात युद्ध होतच राहतील. 

- नितीन फलटणकर



Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ