मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल
छोट्या गोष्टींतूनही आनंद घ्यायला शिका
आपण नेहमी मोठ्या गोष्टींत आनंद शोधत असतो. पण छोट्या-छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंदही मनाला किंवा आपल्याला खूप आधार देऊन जातो. दररोज समोर येणाऱ्या क्षणांत तो दडलेला असतो. पण आपण त्याकडे पाहतच नाही.
आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत घेतलेला सकाळचा वाफाळलेला चहा मनाला शांत करतो. खिडकीतून येणारा गार वारा दिवसभराची ऊर्जा देऊन जातो. पण आपण याला आनंद मानतच नसतो. हे फिल करण्याची आपली इच्छाशक्तीच आपण गमावून बसलेलो असतो.आयुष्यात काही मोठ्या गोष्टी घडल्या तरच त्या आनंदाच्या असतात अशी आनंदाची संकल्पना आपण स्वतःच मनात आणि मेंदूत फिट केलेली असते. मग हे येणारे क्षण असेच सरकून जातात. अलगद. आपल्या ते लक्षातही येत नाही.
आपलं गोड मुल आपल्या जवळ येऊन कडेवर बसतं, इतक्यात फोनची रिंगटोन वाजते आणि आपलं तिथंच बिनसतं. आपण त्याच्याकडे तसेच दुर्लक्ष्य करत फोन कानाला लावून घाईघाईत बाहेर पडतो.एक सेकंदाचा हा आनंद त्या कामाच्या आणि फोनच्या नादात आपण गमावतो. कारण फोनवर कुणीतरी तुमच्या व्यवसायाची ऑर्डर घेऊन आलेलं असतं किंवा कुणीतरी तुमचे पैसे देण्यासाठी तुम्हाला फोन केलेला असतो.मुलाला कडेवर घेऊन त्याला आपल्या ह्रदयाशी घेतल्यानंतर ते समाधान मिळतं ते तुम्ही गमावता. कारण तो आनंद आपल्याला पैशांपुढे शुल्लक वाटतो. दिवसभराच्या धावपळीतून आपल्याला वाटतं की आज आपल्या आयुष्यात चांगलं काहीच घडलंच नाही.पण अशा खूप काही गोष्टी आपण मोठ्या सुखाच्या नादात गमावलेल्या असतात. त्या आपल्याला कळतच नाहीत. कारण आपणच मनाला सुखाची व्याख्या खोटी सांगितलेली असते. त्याच्यावर बिंबवलेलं असतं, मोठं ते सुख. छोट्या गोष्टीत अडकू नकोस. आनंद शोधण्याची पद्धत बदलली की जगणं सोप्पं होतं.
आज एक प्रयोग करून बघा.दिवसातला कोणताही एक छोटा सुंदर क्षण निवडा. तो मनात साठवा.
आणि स्वतःला सांगा. “हा क्षण माझा आहे. आणि मला त्याची किंमत आहे आहे.”
Thanks Google For Photo

Comments
Post a Comment