...आणि तोरणा सर केला!




दरवर्षी मी आणि निहार अशी एक खास ट्रिप काढतो. फक्त आम्ही दोघे. बाप आणि मुलगा. या प्रवासात तिसऱ्या कुणालाही जागा नसते. ही कल्पना खरं तर मागच्या वर्षी स्वातीनेच दिली. तिला एकटीला सोडून जाणं आम्हा दोघांनाही पटत नव्हतं, पण तिचा आग्रह आम्ही मान्य केला… आणि त्या एका निर्णयाने मी आणि निहार अधीक जवळ आलो. 

पत्रकारितेत आलो आणि कामाच्या व्यापात इतका गुरफटलो की, कुटुंबासाठी वेळ देणं मागे पडलं. निहारचं बालपण कधी निसटून गेलं, ते कळलंच नाही. आता तो मोठा झाला… आणि खरंच, बापाच्या चपला मुलाच्या पायात बसायला लागल्या की नातं आपोआप मित्राचं होतं, हे अनुभवायला मिळायला लागलं.

मागच्या वर्षी आम्ही पुणे, रायगड, सातारा, प्रतापगड असा प्रवास केला. यंदा निहार दहावीला गेला. पुढचं वर्ष अभ्यासात जाणार, म्हणून हा छोटासा ब्रेक हवाच होता. यावेळी आम्ही ठरवलं, राजगड, तोरणा आणि वाई!

फक्त तीन दिवस, त्यात एवढं मोठं लक्ष्य… थोडं कठीण वाटत होतं. पण निहारचा उत्साह माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. आमच्यात एक गोष्ट मात्र कॉमन आहे; भटकंती आणि गड-किल्ल्यांची ओढ!

सुरुवात केली वाईपासून. मंदिरांचं शहर… शांत, सुंदर आणि आपुलकीचं. नाना फडणवीसांचा वाडा, घाट, मंदिरं पाहताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. आणि हो, पटवर्धनांची जॉली मिसळ. ती खाल्ल्याशिवाय वाई पूर्ण होत नाही, हे अगदी खरं!

थोडा प्रवास, थोडा थकवा आणि मग आम्ही आनंदवन रिसॉर्टला पोहोचलो. नावाप्रमाणेच अनुभव. शांत, सुंदर आणि मनाला सुखावणारा. त्या मोकळ्या वेळात आम्ही खूप बोललो… करिअर, मित्र, आयुष्य… अनेक विषय. त्या गप्पांमध्ये मला निहार नव्याने सापडला. त्याचा संयम, त्याची शिस्त, त्याची विचार करण्याची पद्धत, सगळंच काहीतरी शिकवून गेलं.

आणि मग खरी परीक्षा...तोरणा!

उन तळपत होतं, वाट अवघड होती आणि माझा स्टॅमिना तर पार्किंगमध्येच हार मानतो की काय असं वाटत होतं. पण निहारचा उत्साह… तो काही वेगळ्याच पातळीवर होता. जणू काही गड जिंकायचाच आहे!

चढाई सुरू झाली. प्रत्येक पावलावर दम लागत होता, पण निहार सोबत होता. कधी मित्रासारखा, कधी मार्गदर्शकासारखा, तर कधी माझा आधार बनून तो मला पुढे नेत होता. त्या क्षणी मला जाणवलं, आज मुलगा बापाला सांभाळतोय.

गडावर पोहोचलो तेव्हा थकवा नव्हता, फक्त समाधान होतं. तोरण्याची अवघड वाटसुद्धा त्या नात्यामुळे सोपी वाटली.

आणि अशा प्रकारे… आम्ही दोघांनी मिळून तोरणा सर केला!

ही ट्रिप फक्त गड जिंकण्याची नव्हती… तर एकमेकांना नव्याने ओळखण्याची होती. बाप आणि मुलगा या नात्याला मैत्रीची उब देणारी होती. आणि म्हणूनच, ही सफर माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी ठरली.

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ