मना सज्जना- आपण नाती तोडत नाही… आपण ती गमावतो
मी नातं जपतोय. की माझ्या भीतीचं ओझं त्यावर टाकतोय?
एक गोष्ट विचारू का. आपण कधी जाणूनबुजून नातं तोडतो का?
या प्रश्नाचं आपल्या साऱ्यांचे उत्तर सारखंच असतं.
बहुतेक वेळा नाही. असंच आपण म्हणतो.
फार क्वचित प्रसंगी आपण नात्यांना पूर्णविराम देतो.
पण तरीही काही नाती आपल्याकडून निसटतात.
हळूच. शांतपणे आणि एक दिवस अचानक लक्षात येतं.
की आपल्यात आता काही उरलेलं नाही.
खरं सांगायचं तर नाती तुटत नाहीत.
ती आपल्या मनातील भीतीमुळे झिजत जातात.
आपण भीती मान्य करत नाही.
पण तिचा परिणाम नात्यांवर होतो.
आपल्याला भीती असते.
आपण पुरेसे नसू.
समोरचा आपल्याला सोडून जाईल.
आपलं दुःख समजून घेतलं जाणार नाही.
म्हणून आपण जास्त अपेक्षा ठेवतो.
कधी जास्त नियंत्रण ठेवतो.
कधी आपण खूपच सावध होतो.
मन मोकळं करत नाही.
खरं वाटत नाही असं म्हणत नाही.
दुखावले गेलोत हे बोलत नाहीत.
कारण आत कुठेतरी भीती असते.
लोकं आपल्याला कमकुवत म्हणतील याची.
ही भीती मग संशयात बदलते.
लहान गोष्टी मोठ्या वाटू लागतात.
एखादा संदेश उशिरा आला.
की मनात प्रश्न उभे राहतात.
आणि आपण नात्याऐवजी कल्पनांशी भांडू लागतो.
काही वेळा मनोविकार हळूच नात्यांत शिरतात.
अतिविचार.
अतिसंवेदनशीलता.
नकारात्मक कल्पना.
आपण समोरच्याच्या प्रत्येक शब्दामागे अर्थ शोधतो.
आणि नातं इथंच दुरावत जातं हे आपल्यालाच कळत नाही.
नात्याला सतत पुरावा द्यायला लावला.
की ते दमून जातं.
प्रेमाचं नातं चौकशी बनतं.
आणि आपुलकी संशयात बदलते.
आपण मनात अनेक गैरसमज निर्माण करायला लागतो,
समोरचा बदललाय.
पण अनेकदा बदल आपणच घडवलेला असतो.
आपल्या भीतीमुळे.
आपल्या न सावरलेल्या मनामुळे.
नातं टिकवायचं असेल.
तर पहिल्यांदा स्वतःकडे पाहावं लागतं.
आपली भीती ओळखावी लागते.
आपल्या मनाच्या जखमा स्वीकाराव्या लागतात.
कारण प्रत्येक वेळी नातं दुरुस्त करायचं नसतं.
कधी कधी मन दुरुस्त केलं.
की नातं आपोआप सावरतं.
आज एक क्षण थांबा.
आणि स्वतःला विचारा.
“मी नातं जपतोय. की माझ्या भीतीचं ओझं त्यावर टाकतोय?”
या प्रश्नाचं उत्तर. अनेक नात्यांना वाचवू शकतं.
--------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार

Comments
Post a Comment