मना सज्जना- सगळंच नियंत्रणात ठेवण्याचा अट्टाहास का?

सगळं मलाच कंट्रोल करता यावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं


सगळंच आपल्या हातात असावं
असं का वाटतं आपल्या प्रत्येकाला?
लोकांनी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागावं.
परिस्थिती आपल्या सोयीची असावी आणि काही चुकलं,
तर लगेच सावरता यावं. मग ती कितीही मोठी का चूक असेना.
सगळं मलाच कंट्रोल करता यावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं.

आपण हे मान्य करत नाहीत.
पण मनाच्या आत खोलवर हा हट्ट दडलेला असतो.
सगळं नियंत्रणात ठेवलं. की आपण सुरक्षित आहोत
अशी भावना आपल्या मनात उगीच घर करून असते.

पण आपल्या योजनेनुसार आयुष्य चालत नाही.
घटना घडत नाहीत. तिथेच माशी शिंकते.
मन अस्वस्थ व्हायला लागतं.
यावरून एक छान झेन कथा आठवली.

एक शिष्य गुरूकडे जातो आणि म्हणतो,
“माझं मन कायम अस्वस्थ असतं.”
गुरू त्याला त्याच्या हाताच्या ओंजळीत पाणी घ्यायला सांगतात
आणि म्हणतात, “हे पाणी घट्ट धर.” शिष्य जितकं घट्ट धरतो.
तितकं पाणी बोटांतून निसटतं. गुरू शांतपणे म्हणतात,
“जे घट्ट पकडायचा प्रयत्न करतोस, तेच सुटत जातं.”

ही कथा तशी पहायला गेली तर अत्यंत साधी आहे.
पण ती आपल्याला आयुष्याबद्दल खूप काही शिकवून जाते. 
आपण नात्यांना घट्ट धरतो.परिस्थितींना घट्ट धरतो.
स्वतःच्या कल्पनांना घट्ट धरतो आणि मग जेव्हा गोष्टी
आपल्या ताब्यात राहत नाहीत.तेव्हा मन घाबरतं.राग येतो. निराशा वाढते.

नियंत्रण सोडणं म्हणजे हार मानणं नाही.
ते म्हणजे वास्तव स्वीकारणं. सगळं आपल्या हातात नसतं.
पण आपण कसा प्रतिसाद देतो. हे मात्र आपल्या हातात असतं.

काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारल्या की मनावरचा ताण कमी होतो.
अपेक्षांचा भार हलका होतो आणि श्वास थोडा मोकळा घेता येतो.

आपण आयुष्याला घट्ट धरून ठेवतो. म्हणून थकतो.
त्याला थोडं सैल सोडलं. की जगणं सोपं होतं.

आज एक छोटा प्रयोग करून बघा.
जे तुम्ही बदलू शकत नाहीत. त्याला थोडा वेळ सोडून द्या
आणि स्वतःला इतकंच सांगा.
“मी सगळं नियंत्रित करू शकत नाही आणि ते ठीक आहे.”
मन शांत होईल. कारण कधी कधी
काही गोष्टींना सोडून देणं हेच मोठं धैर्याचं काम असतं.
------------------------------- 
फोटो साभार, गुगलचे आभार

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ