मना सज्जना- एकटेपणा मनाला खोलवर बोचतो तेंव्हा...

आपल्याला खूप बोलायचं असतं; पण ऐकणारं कुणी नसतं


एकटेपणा म्हणजे केवळ एकटे राहणं नाही.
तो गर्दीतही जाणवतो. भोवती माणसं असतात.
बोलणं, हसणं सुरू असतं. 
पण मन मात्र कुठेतरी कोपऱ्यात बसलेलं असतं.
आपण अनेकदा म्हणतो, “माझ्याकडे सगळं आहे.” घर आहे. 
कुटुंब आहे. ओळखी आहेत. 
तरीही मनात रिकामी जागा भासतेच.
ही रिकामी जागा शब्दांत सांगता येत नाही.
एकटेपणाचा काही गाजावाजा नसतो. 
तो शांतपणे वाढत जातो. हळूहळू. 
नकळत आणि एक दिवस अचानक जाणवतो.
आपण कुणाशी तरी बोलायचं ठरवतो. 
पण शब्द सापडत नाहीत. आपण म्हणतो,
 “काय बोलणार.” आणि गप्प राहतो.
मनात खूप काही साठलेलं असतं. 
पण ते ऐकून घेणारं कोणीच नसतं.
किंवा आपल्यालाच वाटतं. की कुणालाच कळणार नाही.
हा विचार मनाला अधिक एकटं करतो. 
आपण स्वतःभोवती भिंत उभी करतो 
आणि मग तक्रार करतो. की कुणी जवळ येत नाही.
एकटेपणा नेहमी इतरांमुळे येत नाही. 
तो अनेकदा आपल्या न बोलण्यामुळे वाढतो. 
आपल्या दुखण्याला आपणच लपवतो 
आणि आपण किती आनंदी आहोत याचा मुखवटा चढवतो.
कधी कधी खंबीर दिसायची सवय. 
मनाला आतून मोडते. 
कारण प्रत्येक वेळी सावरलेलं राहणं शक्य नसतं.
एकटेपणावर उपाय शोधावा लागतो. 
आपल्याला जाणीव होत असते. 
पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. 
आपण कबुल करायलाच तयार होत नाही की, 
आपण एकटे आहोत. यात आपल्याला कमीपणा वाटतो. 
“मला आज बरं वाटत नाही.” एवढंच म्हणणंही पुरेसं असतं.
स्वतःशी प्रामाणिक राहिलं. की मन थोडं मोकळं होतं.
आणि मोकळं मनच इतरांना जवळ येऊ देतं.
आपण स्वतःला दोष देणं थांबवलं की 
आपोआप एकटेपणा आपल्यापासून दूर पळायला लागतो.
एकटेपणा आपला शत्रू नाही. 
तो एक इशारा आहे. तो सांगतो.
“थांब. स्वतःकडे लक्ष दे.” 
हा इशारा ऐकला.
तर मन हळूहळू सावरतं 
आणि जीवन पुन्हा संवाद साधायला लागतं.
-----------------------
फोटो साभार, गुगलचे आभार. 

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ