मना सज्जना- आपल्या आतही असतं एक जग
आपल्या आयुष्यात भावना सतत येत-जात असतात.
आनंद, राग, दुःख, भीती, अपराधभाव.
पण आपल्याला या भावना हाताळायला कुणी शिकवत नाही.
आपण फक्त त्यांना आवरायचं शिकतो.
राग आला की सांगितलं जातं, “शांत राहा.”
दुःख झालं की म्हणतात, “मनावर घेऊ नकोस.”
भीती वाटली की ऐकायला मिळतं, “धीर धर.”
पण भावना का आल्या, हे विचारायला कुणी थांबत नाही.
भावना दाबणं सोपं वाटतं.
पण त्याची किंमत मनाला मोजावी लागते.
दाबलेल्या भावना नाहीशा होत नाहीत.
त्या आत साठत जातात.
आणि कधी अचानक बाहेर पडतात.
कधी रागाच्या स्फोटासारख्या.
कधी अचानक आलेल्या अश्रूंमधून.
कधी कायमस्वरूपी उदासीनतेच्या रूपात.
भावना हाताळण्याची कला म्हणजे भावना स्वीकारणं.
“हो, मला राग आलाय.”
“हो, मला दुखलंय.”
हे स्वतःला मान्य करणं.
यात कमजोरी नाही.
भावना म्हणजे संदेश असतात.
राग सांगतो की कुठेतरी सीमा ओलांडली गेलीय.
दुःख सांगतं की काहीतरी महत्त्वाचं हरवलंय.
भीती सांगते की मनाला सुरक्षितता हवी आहे.
या भावना ऐकून घेतल्या.
तर त्या आपोआप मऊ होतात.
त्यांना झिडकारलं.
तर त्या हट्टी बनतात.
भावना हाताळताना सर्वात मोठी चूक म्हणजे तुलना.
“लोक याहून मोठं सहन करतात.”
हे वाक्य मनाला अधिक एकटं करतं.
प्रत्येकाची वेदना वेगळी असते.
आणि ती तशीच मान्य केली पाहिजे.
भावना हाताळायच्या म्हणजे त्यावर कृती करायचीच असे नाही.
कधी फक्त त्यांना ओळखणं पुरेसं असतं.
“आज मी अस्वस्थ आहे.”
एवढं मान्य केलं तरी मन हलकं होतं.
ही कला सरावाने येते.
प्रत्येक वेळी नाही जमणार.
पण हळूहळू मन शिकतं.
स्वतःशी भांडण्याऐवजी.
स्वतःशी संवाद साधायला.
भावना शत्रू नाहीत.
त्या आपल्या आतल्या जगाची भाषा आहेत.
ती भाषा समजली.
की आयुष्याशी संवाद सोपा होतो.
हीच आहे.
भावना हाताळण्याची खरी कला.
--------------------------------
फोटो साभार, गुगलचे आभार

Comments
Post a Comment