मुर्शिदाबादनं उघडलं भाजपसाठी पश्चिम बंगालचं दार



महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत भाजपने सलग सरशी केली; पराभवाचे सर्व अंदाज मोडून काढले. पण पश्चिम बंगाल? इथं प्रत्येक निवडणुकीत टीएमसीने भाजपचा विजयी रथ अडवून धरला होता. २०१९ च्या लोकसभा असो वा २०२१ ची विधानसभा. भाजपला वाटत होतं की ‘यावेळी नक्की!’, पण शेवटी ममता बॅनर्जींच्या टीएमसीनंच विजय खेचला.  

बंगालचं राजकीय गणितच वेगळं. धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा इथे सहज पकड घेत नसे.

मात्र, गेल्या काही दिवसांत मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटनांनी हे सगळं चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुर्शिदाबादमध्ये ६६% मुस्लीम आणि ३३% हिंदू लोकसंख्या असल्याने  टीएमसीचे नेते हुमायूं कबीर यांनी “बाबरी मशीद पुनर्निर्माण” करण्याची घोषणा करून संपूर्ण देशाचं राजकीय वातावरणच ढवळून काढलं आहे. टीएमसीने त्यांना तात्काळ निलंबित करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला खरा, पण यावेळी टीएमसीचे पासे उलटे पडले. 

देशभरातील संतांनी बाबरीच्या पार्श्वभूमीवर मुर्शिदाबादेतच तब्बल पाच लाख भक्तांच्या उपस्थितीत गीता पठणचे आयोजन केले. एका बाजूला बाबरी मशीद पुनर्निर्माणाची घोषणा, तर दुसऱ्या बाजूला लाखोंचं गीता पठण. या दोन प्रतिमांनी बंगालचं राजकारण बदललं. भाजप अनेक वर्षांपासून ज्या “बंगालची कवाडं उघडण्याच्या” क्षणांची वाट पाहत होता, तो क्षण आता प्रत्यक्षात उभा राहिल्याची जाणीव कार्यकर्त्यांमध्ये आहे.

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपकडे संघटनशक्ती होती, कॅडरमध्ये उत्साह होता, मोदींची हवा होती; पण टीएमसीविरोधात एक भावनिक, सांस्कृतिक आणि जनमानसाला भिडेल असा मुद्दा त्यांच्या हातात येत नव्हता. बंगालची सामाजिक पार्श्वभूमी आणि अल्पसंख्य बहुसंख्य समीकरण हे टीएमसीसाठी नेहमीच ढाल ठरत होते. पण मुर्शिदाबादने भाजपाला हवा तो टर्निंग पॉईंट मिळाला आहे. 

२०२६ निवडणुकीच्या दिशेने जाताना बंगालचं रणांगण आता फक्त विकासाच्या चर्चांपुरतं मर्यादित राहणार नाही. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटनांनी राज्यात पहिल्यांदाच सांस्कृतिक-धार्मिक प्रतिमांचा मोठा राजकीय प्रभाव तयार केला आहे. आणि दीर्घकाळ बंद असलेली बंगालची दारं आता भाजपसाठी किलकिली झालीत असं म्हणायला हरकत नाही. 

या सगळ्या राजकारणावर आणि हुमांयू यांच्या कृतीवर चपलख बसणारा एक ‘संत कबीरां’चा दोहा आठवतोय, 

हिन्दू कहे मोहि राम पियारा, तुर्क कहे रहमाना
आपस में दोउ लरि मुआ, मरम न काहू जाना।

अर्थ- हिंदू म्हणतात, माझे दैवत श्रीराम, मुसलमान म्हणतात, माझा देव रहमान.

पण दोघेही त्या नावांसाठी एकमेकांशी भांडतात, लढतात…

आणि दोघांनाही त्या देवत्वाचा खरा अर्थ, त्या मागची खरी भावना, खरा संदेश समजतच नाही.


Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ