मना सज्जना- “मन विश्रांती मागतं… पण आपण थांबत नाही”
“मन विश्रांती मागतं… पण आपण थांबत नाही”
कधी मन थकलेलं असतं. पण आपण कधीच ते मान्य करत नाही. आपल्याला वाटतं, “हे काही विशेष नाही.” आणि आपण रोजच्या धावपळीत हरवून जातो. मनाचा थकवा वेगळा असतो. तो शांततेच्या क्षणी अचानक जाणवतो. पण आपण नेहमीच आपल्या मनाला मारत असतो. कारण कामं मोठी वाटतात आणि आपलं मन लहान.
कधी एखादी छोटी घटना चटका लावते. आणि आपण त्यावरच दिवस खराब करतो. खरं म्हणजे मन आधीच थकलं असतं. त्यामुळे लहान गोष्टही मोठी भासते. आपण थोडा ब्रेक घ्यायचा विचार करतो. पण लगेच मागे हटतो. आपल्याला वाटतं, थांबलो तर लोक गैरसमज करतील.
ही भीती मनाला कायम बेडीत अडकवते आणि आपण धावत राहतो. मन आतून हाक देत असतं. अरे, मी थकलोय. जरा माझाही विचार कर. पण त्याची हाक आपल्यापर्यंत पोहचत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. कारण शरीर थकतं हे आपल्याला मान्य असतं. पण मनही थकतं ही कन्सेप्टच आपल्याला पटत नसते.
एखाद्या क्षणी अचानक प्रश्न उभा राहतो. “मी इतका अस्वस्थ का?” उत्तर मनात तयार असतं. पण आपण त्याच्याकडे पाहायचं टाळतो. कधी एखाद्या रात्री झोप लागत नाही. आणि मन स्वतःशी भांडत राहतं. त्याला शांत होण्यासाठी मोठ्या उपायांची गरज नसते. त्याला फक्त थोडं अटेंशन हवं असतं.
दहा मिनिटं शांत बसलो की मन हलकं होतं. दीर्घ श्वास घेतला की विचार मोकळे होतात. थांबणं म्हणजे हार नाही. थांबणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. आपण इतरांची बरीच काळजी करतो. पण स्वतःसाठी थोडाही वेळ काढत नाही. मनाला हा अन्याय आवडत नाही. म्हणून ते विरोध करू लागतं.
आपल्या गतीला थोडा विराम दिला. की मन पुन्हा आपलं होतं. आज स्वतःला एक वाक्य सांगा.
“मी थोडा वेळ थांबत आहे. आणि हे माझ्यासाठी, माझ्या मनासाठी आहे.”
Thanks google for Photo

Comments
Post a Comment