‘मना सज्जना’- स्वतःला प्रश्न विचारायला लागा

 ‘मना सज्जना’

दररोजच्या धकाधकीत मन थकते; पण जीवनात छोटे आनंदही दडलेले असतात. ते शोधायची सवय आपण लावून घेतली तर जग बदलते. म्हणूनच हे सदर ‘मना सज्जना’.,मनाला थोडी उजळण देण्यासाठी.

--------------------------------------------------------- 

स्वतःला प्रश्न विचारायला लागा

कधी जाणवलंय का? काही दिवसांपासून आपण कारण नसताना चिडचिड करतो. आपल्याला वाटतं बाहेरचं सगळं बिघडलंय. पण खरं तर आत काहीतरी अस्वस्थ असतं. ते आपण लगेच ओळखत नाही. कारण मनाला स्वतःकडे पाहायला अजिबात आवडत नाही. आपण बरोबर आहोत असे तो वारंवार सांगत असतं.

आपण म्हणतो, “जग बदललंय.” पण मुळात आपण बदललेले असतो. आजूबाजूला नकारात्मकता वाढलीय. असा आपला समज असतो. पण ती नकळत आपल्यात वाढत गेलेली असते. एखाद्याने दुर्लक्ष केलं की आपलं मन दुखावलं जातं. आणि ते दुखणं रागात रूपांतरित होतं.

राग आला की मनाच्या कोपऱ्यात नकारात्मकतेला आपसुकच जागा मिळते; आणि ती हळूच सवय बनते. ही सवय आपोआप वाढत जाते. कारण आपण यावर स्वतःला प्रश्न विचारत नाहीत.

आपण म्हणतो, “मी असा नाही.” पण वागणं मात्र तसंच होत चाललेलं असतं. कधी एका छोट्या प्रसंगामुळे संपूर्ण दिवस खराब होतो. कोणी कौतुक केलं तर ते आपण लवकर विसरतो. त्यानेच जर आपल्या एखाद्या गोष्टीवर टीका केली तर ती पक्की मनावर कोरली जाते.

हे सगळं नकळत घडतं. आणि आपण हळूहळू नकारात्मक विचारांना घर देतो. मन अंधारात बुडतं. पण आपण कधीच त्या नकारात्मक विचारांचा सामना करत नाहीत. त्यांच्याशी दोन हात करण्याची आपल्याला भीती वाटायला लागते.

म्हणून ‘मना सज्जनाची’ पहिली पायरी सोपी आहे. फक्त स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा.

“मी आज जरा जास्त नकारात्मक तर झालो नाही ना?”

हा प्रश्न विचारला की उत्तर मनाला हलकं करतं. आणि सकारात्मकतेकडे परत जाण्याचा रस्ता दिसायला लागतो.

Photo By Google

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ