अशिया–युरेशियाचं ‘ड्युअल पावर प्रोजेक्शन’

- रशियाला भारताच्या अधिक जवळ आणल्याबद्दल अमेरिकेचे आभार


भारत आणि रशिया दोघेही आता फक्त व्यवहार करणारे देश राहिलेले नाहीत. दोघे मिळून ‘ड्युअल पावर प्रोजेक्शन’ तयार झाले आहे. म्हणजे आशिया–युरेशियामध्ये असे एक शक्तिकेंद्र उदयास आले आहे, जे अमेरिकेच्या मर्जीचे नसेल आणि चीनच्या सावलीतही नसेल. ही संकल्पना आजवर कधीही स्पष्टपणे समोर आली नव्हती. आणि त्यामुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हा दौरा अधिक महत्त्वाचा ठरतो आहे.

मागील काही दिवसांत अमेरिकेच्या धोरणात जी चंचलता दिसून येते आहे, ती प्रत्यक्षात ‘चंचलता’ नसून अमेरिकेचे गडबडलेले धोरण आहे. सत्तेचा सारीपाटच बदलत असताना जगाच्या पटलावरची अनेक समीकरणे नव्याने लिहिली जात आहेत. अशा घडामोडींमध्ये रशिया हा भारताचा सर्वात विश्वासू मित्र म्हणून पुन्हा ठळकपणे उभा राहतो.

स्वातंत्र्यानंतर भारताने कोणताही मोठा निर्णय घेतला. युद्ध असो, कारगिल असो, किंवा अलीकडील पहेलगाव हल्ल्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर असो. रशियाने नेहमीच भारताला पाठबळ दिले. भारतानेही आपल्या मित्राला तशीच साथ दिली. समस्त युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध लादले तेव्हा भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल विकत घेऊन मैत्री निभावली.

आज भारत आणि रशिया इतके जवळ आलेत की जणू सख्खे शेजारी असल्याप्रमाणे दोन्ही देशांमध्ये सततचे व्यवहार सुरू आहेत. पुतिन यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज झाली आहे, परंतु दुसरीकडे बीजिंग, वॉशिंग्टन आणि इस्लामाबादमध्ये अस्वस्थता वाढलेली दिसते.

नोबेल मिळवण्याच्या हव्यासात अमेरिकेच्या विक्षिप्त म्हाताऱ्याने युक्रेन युद्ध भडकावले, पाकिस्तानला भारताविरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर स्वतःच शांततेचा आव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कारस्थान फसल्यावर जगाच्या पटलावर एका नव्या नेतृत्वाचा उदय होताना दिसतो, नरेंद्र मोदी.

पुतिन यांच्या या निर्णयाने अनेक युरोपीय देशांच्या तंतूवर परिणाम झाला आहे. युक्रेन युद्ध निर्णायक टप्प्यावर असतानाही पुतिन भारत भेटीला येत आहेत, यावरून युद्ध थांबवण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, असे इटली, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना वाटू लागले आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे धाबेही दणाणले आहेत. पाकने मागील काही महिन्यात चीनच्या माध्यमातूनही रशियाच्या अधिक निकट जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो यशस्वी होऊ शकलेला नाही. पाकिस्तान लष्कराला रशियाची आधीपासून धडकी आहेच. त्यात रशियामुळे चीनलाही आपली भारत विरोधी भूमिका बदलावी लागत आहे. 

रशियाला मिळतेय भारताकडून ऊर्जा

युरोपचे निर्बंध, अमेरिकेकडून सुरू असलेली निंदा–नालस्ती या परिस्थितीत रशियाकडे आशियाई देशांकडे वळण्याशिवाय पर्याय नव्हता. यात भारत हा पारंपरिक मित्र आणि वाढती बाजारपेठ रशियासाठी जीवनदायी ठरू शकते, हे क्रेमलिनला चांगले ठाऊक आहे. भारतासाठीही रशिया म्हणजे संरक्षणाची हमी. भारतीय लष्कर आजही बहुतांश रशियन शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे. अमेरिकेच्या मुडी आणि कपटी स्वभावामुळे रशिया हा भारतासाठी सर्वात स्थिर, विश्वासू पर्याय ठरतो.

या दौऱ्यात भारताला काय मिळू शकते?

  • पुढील पिढीचे एअर डिफेन्स सिस्टीम्स

  • स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवठा

  • BrahMos-2 सारखे हायपरसॉनिक प्रकल्प

  • संयुक्त संरक्षण उत्पादन, भारतनिर्मित रशियन तंत्रज्ञान, निर्यातक्षमतेत वाढ

  • उत्तर ध्रुवीय मार्ग (Northern Sea Route) व्यापारासाठी खुला: युरोपपर्यंत कमी खर्चाचा समुद्री मार्ग

जगाचे समीकरण बदलण्याची चिन्हं स्पष्ट

भारत आणि रशिया एकत्र येतात म्हणजे, 

  • अमेरिका–युरोपचा आशियातील प्रभाव कमी

  • चीनला संतुलित करणारा नवा प्रतिस्पर्धी

  • तेल आणि ऊर्जा बाजाराची पुनर्रचना

  • जागतिक दक्षिण राष्ट्रांना नवा मार्गदर्शक समूह

या सगळ्यामुळे भारत “फक्त बाजार” न राहता तंत्रज्ञान सह-निर्मात्या देशांच्या क्लबमध्ये स्थिरपणे उभा राहतो. - नितीन फलटणकर

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ