गड्या, आपला गाव बरा...

ग्रामीण भागात सतर्कता, स्वच्छता, सहकार्य, सात्त्विक आहार आणि सामंजस्य या पंचसूत्रीमुळे कोरोना अजूनही तेथे पोहोचलेला नाही. या पाच सूत्रांचा आधार घेत गावं स्वयंस्फूर्तीने कोरोनाशी दोन हात करत आहेत. हे पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात आता आपल्या गावाची ओढ निर्माण झाली आहे. जणू ते म्हणत आहेत, ‘गड्या, आपला गाव बरा...’ 

जगभरातील १८६ देश, भारत आणि महाराष्ट्रही कोरोना विषाणूच्या विळख्यात आहे. Precaution is better than cure (उपचारांपेक्षा सावधगिरी बाळगणे अधिक चांगले). डच तत्त्वज्ञ डेसिडेरियस इरेस्मस याची ही प्रसिद्ध उक्ती आता जगाला खऱ्या अर्थाने ‘समजली’ आणि सर्वत्र सावधगिरीच्या उपाययोजनांना सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तर त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित केले. आता कोरोनाचे रुग्ण कमी होतील असे राज्य सरकारला वाटत होते. मात्र, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले. काही मोजकी शहरं वगळता प्रत्येक शहराच्या वेशीवर कोरोनाचे भूत धडकले आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा, सुशिक्षितपणा, सोयी-सुविधा यामुळे अतिआत्मविश्वास असलेल्या शहरवासीयांनाही आता कोरोनाची चांगलीच धास्ती वाटते आहे. ‘मला काही होत नाही,’ असे म्हणत आपण जणू जन्मत:च अमृत पिऊन आलोय या आविर्भावात फिरणारेही आता गपगुमान घरात बसून आहेत. 

पुणे-मुंबईतून लोंढेच्या लोंढे गावाकडे परत फिरत आहेत, पण काही अपवाद वगळता मराठवाड्यातील गावांत कोरोनाग्रस्त सापडलेला नाही. हे ‘करून दाखवलेय’ ग्रामीण भागातील नागरिकांनी. ते कसे झाले, याच्या मुळाशी जावे लागेल. सध्या सर्वाधिक वाईट अवस्था आहे ती गावकऱ्यांची. सोयी-सुविधा, दळणवळण, मनोरंजनाचा अभाव, शेतमाल जागेवरचं सडतोय, पण या रोगाशी सामना करत आपला बळीराजा मात्र लढतोय.कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय तो कृषी क्षेत्राला. पिकं, फळंभाज्या, हंगामी फळं जागेवरंच खराब झालीत. बळीराजा हताश झालाय. मात्र, त्याने हार मानलेली नाही. लॉकडाऊननंतर गावं, खेडी अधिक सतर्क झाली. चर खोदून रस्ते बंद करण्यात आले. तहसीलदार, तलाठी, पोलिस, अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच यांनी गावागावांत बैठका घेत संभाव्य धोक्याविषयीची माहिती करून दिली. सध्या अनेक जणांनी शेतात राहणे पसंत केलेय. एक समांतर यंत्रणा गावात उभी आहे. प्रशासन ,पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जातेय. 

२०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात १३५६ गावे आहेत. या एकाही गावात कोरोनाचा शिरकाव नाही. संशयामुळे अनेकांना क्वारंटाईन केले असले तरी पॉजेटीव्ह रुग्ण मात्र नाहीत. जालना ही औद्योगिक नगरी. ग्रामीण भागातील तरुणांना तेथील उद्योगांच्या माध्यमातूनच रोजगार मिळतो. सध्या उद्योगाची चाकं थांबलीत, पण ग्रामीण तरुणांनी एक अशी फळी निर्माण केली आहे की त्यामुळे कोरोनाला गावात शिरकाव करता आलेला नाही. जालन्यातील १९७१ गावांपैकी एकाही गावात कोरोनाचा बाधित आढळलेला नाही. बीड हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा. ८० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. तेथेही कोरोनाबाबत विशेष काळजी घेतली जातेय. या काळात सर्वाधिक कळा सोसाव्या लागत आहेत त्या ऊसतोड मजुरांना. उस्मानाबाद जिल्ह्यातील घरटी एकतरी व्यक्ती पुण्यात कामाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर वाशी तालुक्यातील मांडवा या गावात पुण्यातून बस भरून आली होती. सरपंचाला ही माहिती मिळताच त्यांनी सर्वांना आधी वाशीतील आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी करायला लावली. त्यानंतर क्वारंटाईनचे शिक्के मारून घरातून बाहेर न पडण्याच्या अटीवरच त्यांना सोडण्यात आले. लातूर जिल्ह्यातील निलंग्यात काही जण बाधित आढळले होते. ते परराज्यांतून आलेले होते. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळेच हा प्रकार उजेडात आला. हिंगोली, परभणी आणि नांदेडही कोरोना मुक्त आहेत. ग्रामीण भागातील जनतेचा या महाभयंकर विषाणूविरोधातील हा लढा पाहिला की संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील या ओवी किती समर्पक आहे याची जाणीव होते- 

गावाचे जे पवित्र सेवक। तेचि प्रसंगी होती सैनिक। 
ज्या गावी ऐसे सावध पाईक। तेथे विघ्न न ठाके।।
-------------------- 

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ