वेडं प्रेम

ती म्हणते इतकंही करू नकोस प्रेम
मला विसरायला होतं सारं जग…
तो मात्र हट्टानं म्हणतो तूच माझं जग….
तूच माझं जग…!
ती म्हणते वेड्यासारखा झुरू नकोस
थोडं मँच्युअर्ड असावं ना आपलं प्रेम
तो तरीही हट्टीपणानं म्हणतो….
जे मँच्युअर्ड असतं ते नसतंच मुळी प्रेम !
शेवटी ती त्याच्यापुढे हार मानते
हनुवटीवर हात ठेवून त्याच्यासमोर बसते
आता मात्र त्याची कळी जाम खुलते
तिला म्हणतो...अगं रोज अश्शीच तू स्वप्नात येऊन बसते
त्याच्या डोळ्यातलं अफाट प्रेम पाहून
तिच्या डोळ्यात येतंच न राहवून पाणी
ते पाहून आता मात्र ह्याचा जीव कासावीस
म्हणे रोजच्यासारखी रागव..भांड हवं तर..पण हस ना गं राणी
हसवण्यासाठी प्रियेला मग तो करतो जीव तोडून प्रयत्न
पाहून त्याची ती वेडी धडपड खुदकन् गाली हसते ती
तोही होतो मग तिचं गोड हसू पाहून आनंदानं वेडापिसा !
खळखळून हसता हसता एका क्षणी……
एका क्षणी होतात मग दोघेही स्तब्ध !
विसरून स्थळकाळाचं भान हरपून देहभान
मूकपणे डोळ्यात डोळे घालून पहात राहतात
ना कुठला स्पर्श …...ना कसले शब्द
शांततेत होत राहतो शब्दांविनाच संवाद
तहानलेल्याच्या कंठात माठातलं थंडगार
पाणी उतरतं...तसं….अगदी तसंच…..
उतरत राहतं प्रेम एकमेकांच्या मनात !
फोटो स्त्रोत:- साभार गुगल
Comments
Post a Comment